Sunday, July 27, 2008

उगवत्याच्या देशातील उगवता सुर्य ....

गेल्या एका वर्षात एकंदर इथल्या वास्तव्यात तसे अनेक अवर्णीय असे आनंदाचे क्षण आले असतील. प्रत्येक क्षण आपआपल्या जागी उच्च असतोच. तरीदेखील सर्वात उच्च क्षण कोणता असेल असा जेंव्हा प्रश्न पडतो तेंव्हा आठवणींची पाने भर्रकन उलटली जातात ते अगदी थेट मागल्या उन्हाळ्यापर्यंत. गेल्या वर्षी ह्याच काळात आम्ही जपान मधील सर्वात उंच शीखर माउंट फुजी सर करुन आलो होतो. ही आठ्वण येण्याचे अजुन एक कारण म्हणजे अशातच आमची काही मित्रमंडळी माउंट फुजी सर करुन आले त्यांच्या गोष्टी ऐकून मागील वर्षाची आमची मोहीम अगदी काल परवा पार पडली असं वाटुन गेलं.

मुळात हा माउंट फुजी हा एक निद्र्स्त ज्वालमुखी आहे. सुमारे ३७७६ मीटर उंचीचा हे विशाल शिखर वर्षातील बरेच महिने बर्फाछ्छादित असते. बर्फ वीतळल्यावर उन्हाळ्याचे २ महिनेच हा चढाईसाठी खुला असतो. इथल्या संस्क्रुतीत पर्वतालादेखील ईश्वर मानतात त्यातही ह्या माउंट फुजीचे स्थान आगळंवेगळं असावं. हा माउंट फुजी विविध जपानी कलांमध्ये सुद्धा डोकावत असतो. बऱ्याच शोभेच्या वस्तुंवरच्या चित्रांमधे हा पर्वत कुठेतरी कोपऱ्यात चितारलेला असतोच. मला तशी गिर्यारोहणाची आवडही नाही आणि नावडही नाही अनुभव तर मुळीच नाही. शिवाय गेली काही वर्षे संगणकाच्या क्षेत्रात काम करत असल्याने शारीरीक क्षमतेबद्दल खात्री नाही. मोहीमेसाठी लागणाऱ्या सामानची तर वानवाच होती. पण आत कुठेतरी चढण्याची प्रबळ ईच्छा होती. मग काय वरील गोष्टी उसन्या घेतल्या (थोडं अवसान देखिल). वर चढतांना थंडी वाढत जाणार होती. एखादं चागलं जाकीट, मफलर, हातमोजे ह्या तर महत्वाच्या होत्या. तेंव्हा शेजारी रहात असलेल्या उन्नतीने जाकीट दिलं, धनश्रीने मफलर दिलं सोबत दोघींचे सल्ले मोफत मिळालेच हे काही वेगळं सांगणे न लगे.
माउंट फुजी चढाईचे एकंदर दहा स्तर आहेत. आपल्याला अगदी दहा च्या दहा नाही चढावे लागत (नशीब) पाचव्या स्तरापर्यंत बस जाते. संध्याकाळी पाचव्या स्तरापासुन चढाई सुरु करायची रात्रभर वाटचाल करुन सकाळी पहाटे वरच्या टोकावर पोह्चायचं तिथुन होणाऱ्या सुर्योदयाचं दर्शन घ्यायचं लगेच उतरायला सुरुवात करुन दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत खाली परत. हा असा ढोबळ आराखडा होता पण दहा जणांचा चमु सोबत घेउन चढतांना तो किती आणि कसा अमलात येइल ते सांगता येत नव्हतं. शेवटी त्या शनीवारी दुपारी आम्ही सगळे टोकीयोहुन निघालो. सोबत खाण्यापीण्याचं सामान घेतलं होतंच तसं वरती चढतांना प्रतेक स्तरावर काही दुकाने आराम करण्यासाठी होटेलवजा झोपड्या असतात पण ते सारे अतीशय महाग असतं. रात्रीच्या अंधारात चढाई करायची असल्याने हेडलाईट्सुद्धा घेतला होता. २-३ तासांचा रेल्वेचा प्रवास नंतर थोडा बसचा प्रवास करुन संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आम्ही सारे पाचव्या स्तरापर्यंत पोहचलो. हेच ठिकाण मला फार उंच वाटलं, आम्ही पोहचेपर्यंत सुर्यास्त होत आलेला होता वरचा उंच माउंट फुजी हळुहळु दिसेनासा होत होता.
जेव्हा खाणेपीणे उरकुन सगळ्या सामानाशी तयार झालो तेंव्हा वर चढण्याच्या वाटेशिवाय काहीच दिसत नव्हतं. पाच ते सहावा स्तर हे अंतर तुलनेने सोपे आणि कमी समजल्या जाते. पण ते अंतर कापता कापता माझी बरीच दमछाक झाली. ह्या टप्यामधे चढण्या उतरण्याचा मार्ग एकच आहे. आम्ही चढतांना काही गिरीवीर परत येतांना दिसत होते. काहीजण तर इतके गलीतगात्र झाले होते ते पाहुन उद्या आपली चित्र कसं असेल त्याची कल्पना आली. आजुबाजुला थोडी दाट झाडी होती. इथेच मला माझ्या हेडलाईट ने दगा दिला तो एकदा बंद झाला तो काही केल्या सुरुच झाला नाही. हिच गत इतर एका दोघांची झाली. मग काय एकमेकांच्या डोक्यावरुन पडलेल्या प्रकाशात पुढची वाटचाल सुरु झाली. हे अंतर शेवटी पार झालं. सहाव्या स्तराला थोदा वेळ विश्राम घेउन लगेच पुढच्या वाटेला लागलो कारण ती मोठी तर होतिच शिवाय खडतरदेखील. हळुहळु आजुबाजुची झाडी कमी होत होती. थंडी वाढत होती. हा जरा खडकाळ भाग होता त्यामुळे चढायला जरा कठीण असला तरी कमी वेळात आपण भराभर वर चढु शकत होतो. चालता चालता आणि बोलता बोलता हा देखिल टप्पा पार पडला. प्रत्येक स्तरावर छोटी छोटी दुकाने होती, स्वच्छताग्रुहची सोयही होती. वर चढतांना इथले दिवेच जणु दिपस्तंभासारखं काम करत होतं.
त्या दिव्यांकडे पाहुनच आपल्या अंतराची कल्पना करायची. एका वेळी एक ते दोन स्तरांवरचे दिवे दिसतात ते पाहुन चढायचं तिथे पोहचतो न पोहचतो तोच त्याच्या अजुन वरचे दिवे लुकलुकत आपली वाट पहात असायचे. पुन्हा थोडी विश्रांती घेउन पुढे चालत राहायचं मागे वळुन खाली पाहीलं तर त्या अंधारात काही फारसं दिसात नव्हतं तरीही आपण चढुन आलेल्या अंतराची कल्पना तेव्हढी यायची. चढण्याकरीता काही ठिकाणी पायऱ्या केलेल्या तर काही ठिकाणी मोठे लोखंडी गज रोवलेले होते. तर काही ठिकाणी फक्त दगडांचा आधार घेउन चढायचं होतं. पण अजुन वर चढतांना जागो जागी थांबायला होतं होते. सगळे जण सोबत चढणे शक्य नव्हतं. आपोआप आमचे लहान लहान गट पडले. मी, निलय आणि समथा सोबत चढत होतो. बाकीचे पुढे गेले होते. आठव्या स्तरावर मात्र जरा त्रास वाढला. तिथे ते दोघे म्हणाले की अजुन चढणे त्यांना शक्य नाही. माझी मनस्थीती पण तशीच झाली होती. वाटत होते इथुनच परत जावं पण म्हंटलं जरा पुढच्या स्तरापर्यंततरी जाउन पाहु. शेवटी त्यांचा निरोप घेतला आणि पुढे गेलेल्यांना गाठण्यासाठी जरा भरभरच निघालो. बराच वेळ एकटाच चालत होतो. जाम थकवा आला होता. पण जास्त वेळ थांबता येत नव्हतं चढतांना किमान थंडी तरी वाजत नव्हती, पण जरा जास्त थांबलो तर गारठाण्याचीच भिती होती. थांबला तो संपला हाच तिथला न्याय होता. कसं बसं एकटाच बरच वेळ चालत होतो. जरा एका ठिकाणी टेकलो मनात आले बस झालं इकडे एव्हढं करुन काय मिळणार आहे, कशाला पाहीजे असे नसते उद्दोग चढला तेव्हढं बस. नसते दुखणे ओढावुन घेशील. मुळात हा आपला पिंडच नाही. अशा अनेक विचारात असतांनाच समोरुन एक जख्ख म्हातारा आणि सोबत त्याचा ७-८ वर्षाचा नातू पुढे गेले. त्यांना पाहुन परत जरा हुरुप आला म्हंटल हजारो असे लोक चढतात मग आपल्याला का नाही जमणार. थोडं अंतर जातो न जातोच तर ओळखीचा आवाज कानावर पडू लागला बाकीचे सर्व मित्र जवळच होते. शेवटी सोबत मिळाल्याने उत्साह आला व आपण पुर्ण चढु शकु असं वाटू लागल पुढे इंच इंच चढतांना थंडी वाढल्यासारखी वाटत होती. दात कडाकडा वाजुन ताल धरत होते. प्राणवायुची पातळी जरा कमी झाली असावी. काही लोकांनी तर प्राणवायु घ्यायला लहान लहान सीलेंडर देखिल आणले होते त्यातुन मधे मधे ते श्वास घेत होते. इथुन पुढे बरीच गर्दी झाली होती. वाट जरा अरुंद झाली होती म्हणुन असेल किंवा सगळ्याच लोकांचा थकल्यामुळे वेग कमी झाला असेल म्हणुन पण प्रत्येक पावलागणीक थांबावं लागत होतं सुर्योदय होण्याच्या आगोदर शीखराच्या टोकावर पोहचणे शक्य नाही हे समजुन चुकलं म्हणुन मन जरा खट्टु झालं. सकाळचे चार साडेचार वाजले असतील आम्ही नवव्या स्तराजवळ असु तोच क्षितीजावर लाल रेषा उमटायला सुरुवात झाली।

शेवटी तीथुनच सुर्योदयाचं दर्शन घ्यायचं ठरलं. जरा मोकळी जागा पाहुन सर्वांनी आपलं बस्तान माडलं आणि क्षितीजावरच्या रंगमचाचा पडदा वर जाण्याची वाट पहात बसलो. एखाद्या सराइत चित्रकाराने एका फटक्यात लाल रंगाच्या विविध छटा आपल्या कुंचल्यातुन साकाराव्या तशा छटा निर्सगचित्रकाराने आकाशाच्या पटलावर उमटवल्या. मग सुरु झालं एकुलती एक आणि तीदेखिल मुख्यनायकी भुमिका असलेलं सुर्यनारायणाचं नाट्य. क्षणा क्षणाला वेगाने अंधार दुर सरत होता. खाली जमिन न दिसता फक्त शुभ् कापसाच्या राशी पसरलेल्या दिसत होत्या. त्याच्या खालुन एक तेजोनिधी लोहगोल वेगाने वर येत असल्याच स्पष्टपणे दिसत होतं. त्या नाट्यातला एकही क्षण गमावयची माझी ईच्छा नव्हती म्हणुन की काय पण आपोआप पापण्यांची उघडझाप मंदावली. शेवटी तो लोहगोल संपुर्णपणे त्या शुभ्र नभोमंडला भेदुन वर आला आणि मनात फक्त आलं "ह्याची साठी तर केला अट्ट्हास....." दहाही दिशा उजळलेल्या प्रत्यक्षात दिसत होत्या. जसा त्याने पुढल्या अंकात प्रवेश केला तेंव्हा मात्र उघड्या डोळ्यांना ती प्रखरता सहन होइनाशी झाली. मग आम्ही त्याच्याकडे पाठ फिरवून पुढ्च्या चढाईला लागलो.
सुर्य उगवल्या नंतरची वाटचाल तर अजुन खडतर असणार होती. वेळेगणीक त्याची प्रखरता वाढणार आणि मधे झाड झुडपं सोडा एखाद्या काडीएव्हढा देखिल आडोसा नाही. सोबतचा पाण्याचा साठा केव्हाच संपलेला उरली होती फक्त शीखर सर करण्यची ईच्छा. इथे आमच्या गटातील काहींनी परतीचा निर्णय घेतला. उरलो मी, विजेश आणि गिरीश. तिघांनी चढायला सुरुवात केली. थोडं अंतर चढुन गेलो पण समजलं जरा जास्त वेळ विश्रांतीची गरज आहे कारण रात्रभर ही चढाई सुरुच होती ना. वाटेच्या बाजुला जागा शोधुन तिथे चक्क एखादा तास ताणून दिली. इथल्या भागात दगडं माती लाल रंगाची होती. वर फक्त नीळं निरभ्र आकाश तिळाएव्हढा देखील ढग नाही, सगळे ढग आमच्या खालती. इतक्या थकलेल्या अवस्थेतसुद्धा मला "आज मै उपर आसमा नीचे...." ह्या कुठल्यातरी हिंदी गाण्याच्या ओळी प्रत्यक्षात जगत असल्याने खुप आंनद झाला. आकाशातलॆ ढग बघायला कधी मान खाली करावी लागेल असं स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. दुर तिकडे बरेच लोक परतीच्या वाटेला लागलेले. सर्वात शेवटचा टप्पा द्रुष्टीपथात आलेला होता, हे सगळं पहाता पहाता झोप घ्यायचं विसरुनच गेलो. मागे उरलेलं हत्तीचं शेपुट लवकर संपवावं असं वाटत होतं. थोडावेळाने उठुन परत चढाईला लागलो. इथेसुद्धा बरीच गर्दी होती चढायला खुप वेळ लागत होता. वर काही लोक स्वागतासाठी झेंडे फडकवत होते. टाळ्या वाजवत होते. अखेर तो शेवटचा दगड पार केला डोळ्यात का कुणास ठाऊक टचकन पाणी आलं, आम्ही तीघांनी एकमेकांना कडकडुन मिठी मारल्या, एकमेकांच्या सोबतीशिवाय हा टप्पा गाठणं शक्यच नव्हतं. तसच इतक्या वेळ सोबत असलेल्या पण शेवटच्या टप्प्यावर मात्र पोहचू न शकलेल्या आमच्या उरलेल्या मित्रांची खुप आठवण आली.

टिप: अगोदरच खुप लांबलेल्या ह्या लेखाचा शेवट कॄत्रिम वाटला तरी मी इथेच करतो, एकतर ह्यापुढ्च्या भावना वर्णन करायला माझ्याकडे शब्दतर नाहीतच शिवाय त्या सर्वोच्च बिंदुपासुन खाली उतरण्याची माझी ईच्छादेखील नाही.