Sunday, July 27, 2008

उगवत्याच्या देशातील उगवता सुर्य ....

गेल्या एका वर्षात एकंदर इथल्या वास्तव्यात तसे अनेक अवर्णीय असे आनंदाचे क्षण आले असतील. प्रत्येक क्षण आपआपल्या जागी उच्च असतोच. तरीदेखील सर्वात उच्च क्षण कोणता असेल असा जेंव्हा प्रश्न पडतो तेंव्हा आठवणींची पाने भर्रकन उलटली जातात ते अगदी थेट मागल्या उन्हाळ्यापर्यंत. गेल्या वर्षी ह्याच काळात आम्ही जपान मधील सर्वात उंच शीखर माउंट फुजी सर करुन आलो होतो. ही आठ्वण येण्याचे अजुन एक कारण म्हणजे अशातच आमची काही मित्रमंडळी माउंट फुजी सर करुन आले त्यांच्या गोष्टी ऐकून मागील वर्षाची आमची मोहीम अगदी काल परवा पार पडली असं वाटुन गेलं.

मुळात हा माउंट फुजी हा एक निद्र्स्त ज्वालमुखी आहे. सुमारे ३७७६ मीटर उंचीचा हे विशाल शिखर वर्षातील बरेच महिने बर्फाछ्छादित असते. बर्फ वीतळल्यावर उन्हाळ्याचे २ महिनेच हा चढाईसाठी खुला असतो. इथल्या संस्क्रुतीत पर्वतालादेखील ईश्वर मानतात त्यातही ह्या माउंट फुजीचे स्थान आगळंवेगळं असावं. हा माउंट फुजी विविध जपानी कलांमध्ये सुद्धा डोकावत असतो. बऱ्याच शोभेच्या वस्तुंवरच्या चित्रांमधे हा पर्वत कुठेतरी कोपऱ्यात चितारलेला असतोच. मला तशी गिर्यारोहणाची आवडही नाही आणि नावडही नाही अनुभव तर मुळीच नाही. शिवाय गेली काही वर्षे संगणकाच्या क्षेत्रात काम करत असल्याने शारीरीक क्षमतेबद्दल खात्री नाही. मोहीमेसाठी लागणाऱ्या सामानची तर वानवाच होती. पण आत कुठेतरी चढण्याची प्रबळ ईच्छा होती. मग काय वरील गोष्टी उसन्या घेतल्या (थोडं अवसान देखिल). वर चढतांना थंडी वाढत जाणार होती. एखादं चागलं जाकीट, मफलर, हातमोजे ह्या तर महत्वाच्या होत्या. तेंव्हा शेजारी रहात असलेल्या उन्नतीने जाकीट दिलं, धनश्रीने मफलर दिलं सोबत दोघींचे सल्ले मोफत मिळालेच हे काही वेगळं सांगणे न लगे.
माउंट फुजी चढाईचे एकंदर दहा स्तर आहेत. आपल्याला अगदी दहा च्या दहा नाही चढावे लागत (नशीब) पाचव्या स्तरापर्यंत बस जाते. संध्याकाळी पाचव्या स्तरापासुन चढाई सुरु करायची रात्रभर वाटचाल करुन सकाळी पहाटे वरच्या टोकावर पोह्चायचं तिथुन होणाऱ्या सुर्योदयाचं दर्शन घ्यायचं लगेच उतरायला सुरुवात करुन दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत खाली परत. हा असा ढोबळ आराखडा होता पण दहा जणांचा चमु सोबत घेउन चढतांना तो किती आणि कसा अमलात येइल ते सांगता येत नव्हतं. शेवटी त्या शनीवारी दुपारी आम्ही सगळे टोकीयोहुन निघालो. सोबत खाण्यापीण्याचं सामान घेतलं होतंच तसं वरती चढतांना प्रतेक स्तरावर काही दुकाने आराम करण्यासाठी होटेलवजा झोपड्या असतात पण ते सारे अतीशय महाग असतं. रात्रीच्या अंधारात चढाई करायची असल्याने हेडलाईट्सुद्धा घेतला होता. २-३ तासांचा रेल्वेचा प्रवास नंतर थोडा बसचा प्रवास करुन संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आम्ही सारे पाचव्या स्तरापर्यंत पोहचलो. हेच ठिकाण मला फार उंच वाटलं, आम्ही पोहचेपर्यंत सुर्यास्त होत आलेला होता वरचा उंच माउंट फुजी हळुहळु दिसेनासा होत होता.
जेव्हा खाणेपीणे उरकुन सगळ्या सामानाशी तयार झालो तेंव्हा वर चढण्याच्या वाटेशिवाय काहीच दिसत नव्हतं. पाच ते सहावा स्तर हे अंतर तुलनेने सोपे आणि कमी समजल्या जाते. पण ते अंतर कापता कापता माझी बरीच दमछाक झाली. ह्या टप्यामधे चढण्या उतरण्याचा मार्ग एकच आहे. आम्ही चढतांना काही गिरीवीर परत येतांना दिसत होते. काहीजण तर इतके गलीतगात्र झाले होते ते पाहुन उद्या आपली चित्र कसं असेल त्याची कल्पना आली. आजुबाजुला थोडी दाट झाडी होती. इथेच मला माझ्या हेडलाईट ने दगा दिला तो एकदा बंद झाला तो काही केल्या सुरुच झाला नाही. हिच गत इतर एका दोघांची झाली. मग काय एकमेकांच्या डोक्यावरुन पडलेल्या प्रकाशात पुढची वाटचाल सुरु झाली. हे अंतर शेवटी पार झालं. सहाव्या स्तराला थोदा वेळ विश्राम घेउन लगेच पुढच्या वाटेला लागलो कारण ती मोठी तर होतिच शिवाय खडतरदेखील. हळुहळु आजुबाजुची झाडी कमी होत होती. थंडी वाढत होती. हा जरा खडकाळ भाग होता त्यामुळे चढायला जरा कठीण असला तरी कमी वेळात आपण भराभर वर चढु शकत होतो. चालता चालता आणि बोलता बोलता हा देखिल टप्पा पार पडला. प्रत्येक स्तरावर छोटी छोटी दुकाने होती, स्वच्छताग्रुहची सोयही होती. वर चढतांना इथले दिवेच जणु दिपस्तंभासारखं काम करत होतं.
त्या दिव्यांकडे पाहुनच आपल्या अंतराची कल्पना करायची. एका वेळी एक ते दोन स्तरांवरचे दिवे दिसतात ते पाहुन चढायचं तिथे पोहचतो न पोहचतो तोच त्याच्या अजुन वरचे दिवे लुकलुकत आपली वाट पहात असायचे. पुन्हा थोडी विश्रांती घेउन पुढे चालत राहायचं मागे वळुन खाली पाहीलं तर त्या अंधारात काही फारसं दिसात नव्हतं तरीही आपण चढुन आलेल्या अंतराची कल्पना तेव्हढी यायची. चढण्याकरीता काही ठिकाणी पायऱ्या केलेल्या तर काही ठिकाणी मोठे लोखंडी गज रोवलेले होते. तर काही ठिकाणी फक्त दगडांचा आधार घेउन चढायचं होतं. पण अजुन वर चढतांना जागो जागी थांबायला होतं होते. सगळे जण सोबत चढणे शक्य नव्हतं. आपोआप आमचे लहान लहान गट पडले. मी, निलय आणि समथा सोबत चढत होतो. बाकीचे पुढे गेले होते. आठव्या स्तरावर मात्र जरा त्रास वाढला. तिथे ते दोघे म्हणाले की अजुन चढणे त्यांना शक्य नाही. माझी मनस्थीती पण तशीच झाली होती. वाटत होते इथुनच परत जावं पण म्हंटलं जरा पुढच्या स्तरापर्यंततरी जाउन पाहु. शेवटी त्यांचा निरोप घेतला आणि पुढे गेलेल्यांना गाठण्यासाठी जरा भरभरच निघालो. बराच वेळ एकटाच चालत होतो. जाम थकवा आला होता. पण जास्त वेळ थांबता येत नव्हतं चढतांना किमान थंडी तरी वाजत नव्हती, पण जरा जास्त थांबलो तर गारठाण्याचीच भिती होती. थांबला तो संपला हाच तिथला न्याय होता. कसं बसं एकटाच बरच वेळ चालत होतो. जरा एका ठिकाणी टेकलो मनात आले बस झालं इकडे एव्हढं करुन काय मिळणार आहे, कशाला पाहीजे असे नसते उद्दोग चढला तेव्हढं बस. नसते दुखणे ओढावुन घेशील. मुळात हा आपला पिंडच नाही. अशा अनेक विचारात असतांनाच समोरुन एक जख्ख म्हातारा आणि सोबत त्याचा ७-८ वर्षाचा नातू पुढे गेले. त्यांना पाहुन परत जरा हुरुप आला म्हंटल हजारो असे लोक चढतात मग आपल्याला का नाही जमणार. थोडं अंतर जातो न जातोच तर ओळखीचा आवाज कानावर पडू लागला बाकीचे सर्व मित्र जवळच होते. शेवटी सोबत मिळाल्याने उत्साह आला व आपण पुर्ण चढु शकु असं वाटू लागल पुढे इंच इंच चढतांना थंडी वाढल्यासारखी वाटत होती. दात कडाकडा वाजुन ताल धरत होते. प्राणवायुची पातळी जरा कमी झाली असावी. काही लोकांनी तर प्राणवायु घ्यायला लहान लहान सीलेंडर देखिल आणले होते त्यातुन मधे मधे ते श्वास घेत होते. इथुन पुढे बरीच गर्दी झाली होती. वाट जरा अरुंद झाली होती म्हणुन असेल किंवा सगळ्याच लोकांचा थकल्यामुळे वेग कमी झाला असेल म्हणुन पण प्रत्येक पावलागणीक थांबावं लागत होतं सुर्योदय होण्याच्या आगोदर शीखराच्या टोकावर पोहचणे शक्य नाही हे समजुन चुकलं म्हणुन मन जरा खट्टु झालं. सकाळचे चार साडेचार वाजले असतील आम्ही नवव्या स्तराजवळ असु तोच क्षितीजावर लाल रेषा उमटायला सुरुवात झाली।

शेवटी तीथुनच सुर्योदयाचं दर्शन घ्यायचं ठरलं. जरा मोकळी जागा पाहुन सर्वांनी आपलं बस्तान माडलं आणि क्षितीजावरच्या रंगमचाचा पडदा वर जाण्याची वाट पहात बसलो. एखाद्या सराइत चित्रकाराने एका फटक्यात लाल रंगाच्या विविध छटा आपल्या कुंचल्यातुन साकाराव्या तशा छटा निर्सगचित्रकाराने आकाशाच्या पटलावर उमटवल्या. मग सुरु झालं एकुलती एक आणि तीदेखिल मुख्यनायकी भुमिका असलेलं सुर्यनारायणाचं नाट्य. क्षणा क्षणाला वेगाने अंधार दुर सरत होता. खाली जमिन न दिसता फक्त शुभ् कापसाच्या राशी पसरलेल्या दिसत होत्या. त्याच्या खालुन एक तेजोनिधी लोहगोल वेगाने वर येत असल्याच स्पष्टपणे दिसत होतं. त्या नाट्यातला एकही क्षण गमावयची माझी ईच्छा नव्हती म्हणुन की काय पण आपोआप पापण्यांची उघडझाप मंदावली. शेवटी तो लोहगोल संपुर्णपणे त्या शुभ्र नभोमंडला भेदुन वर आला आणि मनात फक्त आलं "ह्याची साठी तर केला अट्ट्हास....." दहाही दिशा उजळलेल्या प्रत्यक्षात दिसत होत्या. जसा त्याने पुढल्या अंकात प्रवेश केला तेंव्हा मात्र उघड्या डोळ्यांना ती प्रखरता सहन होइनाशी झाली. मग आम्ही त्याच्याकडे पाठ फिरवून पुढ्च्या चढाईला लागलो.
सुर्य उगवल्या नंतरची वाटचाल तर अजुन खडतर असणार होती. वेळेगणीक त्याची प्रखरता वाढणार आणि मधे झाड झुडपं सोडा एखाद्या काडीएव्हढा देखिल आडोसा नाही. सोबतचा पाण्याचा साठा केव्हाच संपलेला उरली होती फक्त शीखर सर करण्यची ईच्छा. इथे आमच्या गटातील काहींनी परतीचा निर्णय घेतला. उरलो मी, विजेश आणि गिरीश. तिघांनी चढायला सुरुवात केली. थोडं अंतर चढुन गेलो पण समजलं जरा जास्त वेळ विश्रांतीची गरज आहे कारण रात्रभर ही चढाई सुरुच होती ना. वाटेच्या बाजुला जागा शोधुन तिथे चक्क एखादा तास ताणून दिली. इथल्या भागात दगडं माती लाल रंगाची होती. वर फक्त नीळं निरभ्र आकाश तिळाएव्हढा देखील ढग नाही, सगळे ढग आमच्या खालती. इतक्या थकलेल्या अवस्थेतसुद्धा मला "आज मै उपर आसमा नीचे...." ह्या कुठल्यातरी हिंदी गाण्याच्या ओळी प्रत्यक्षात जगत असल्याने खुप आंनद झाला. आकाशातलॆ ढग बघायला कधी मान खाली करावी लागेल असं स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. दुर तिकडे बरेच लोक परतीच्या वाटेला लागलेले. सर्वात शेवटचा टप्पा द्रुष्टीपथात आलेला होता, हे सगळं पहाता पहाता झोप घ्यायचं विसरुनच गेलो. मागे उरलेलं हत्तीचं शेपुट लवकर संपवावं असं वाटत होतं. थोडावेळाने उठुन परत चढाईला लागलो. इथेसुद्धा बरीच गर्दी होती चढायला खुप वेळ लागत होता. वर काही लोक स्वागतासाठी झेंडे फडकवत होते. टाळ्या वाजवत होते. अखेर तो शेवटचा दगड पार केला डोळ्यात का कुणास ठाऊक टचकन पाणी आलं, आम्ही तीघांनी एकमेकांना कडकडुन मिठी मारल्या, एकमेकांच्या सोबतीशिवाय हा टप्पा गाठणं शक्यच नव्हतं. तसच इतक्या वेळ सोबत असलेल्या पण शेवटच्या टप्प्यावर मात्र पोहचू न शकलेल्या आमच्या उरलेल्या मित्रांची खुप आठवण आली.

टिप: अगोदरच खुप लांबलेल्या ह्या लेखाचा शेवट कॄत्रिम वाटला तरी मी इथेच करतो, एकतर ह्यापुढ्च्या भावना वर्णन करायला माझ्याकडे शब्दतर नाहीतच शिवाय त्या सर्वोच्च बिंदुपासुन खाली उतरण्याची माझी ईच्छादेखील नाही.

Saturday, April 5, 2008

सांगा वसंत कुणी हा पहिला...

गेले दोन तिन महीने असलेले थंडीचे दिवस कसे बसे कुडकुडत काढले. सगळ्या हालचाली कशा थंड झाल्या होत्या. गुलाबी थंडी वगैरे असली विशेषणे काही टोकियोच्या थंडीला लागु पडत नाही. शेवटी तिकडे भारतात होळी जळाली आणि इकड़ची पण थंडी पळाली. मग वेध लागले ते सकुरा म्हणजे चेरी ब्लोसोमचे. बहुतेक झाडे निर्जीव झाल्यासारखी उभी होती. सगळी कशी काळी काळी अंगावर एकही पान नसलेली सजिवत्वाची एकही खुण न दाखवणारी. रोज येता जाताना तसली झाडे पाहून पाहून नजर देखील सरावली होती. पण एक दिवस अचानक नेहमीच्या रसत्यावरुन वळतांना त्या कडेवर असलेल्या झाडेने जणू हाकच दिली पाहतो तर काय त्याने चक्कमोहरायाला सुरवात केली होती. वसंत येत असल्याची ती नांदीच होती. शेवटी तो आला हाहाम्हणता एकूण एक सकुराचे झाड़ फुलायाला सुरवात झाली, एव्हढ चैतन्य इतके दिवस कसे ह्या झाडांनी लपवून ठेवले असे वाटले . इथला वसंत ऋतु कोकिळेच्या गाण्याची वगैरे वाट बघत नाही, तसही इकडे काउ चिऊ दिसतात पण कोकीळ आहे का माहित नाही. तसा वसंत ऋतु कही पहिल्यादा पहिला असे नाही, झाडांना पालवी फुटलेली पहिली आहे. काही झाडांना फुलानी बहरलेले पाहिले आहे. पण या वसंत ऋतुचे एवढे व्यापक अणि सुंदर रूप नव्ह्ते पहिलं. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात हे सर्व ऋतुंचे खांदेपालट बघायला वेळ कुठे असतो पण हा होणारा बदल लक्ष्यात आणून द्यायचे काम जागोजागी असलेली स्टेशनमधिल सकुराच्या छायाचित्रांनी नटलेले जहिरातिचे फलक, दुकानांची सजावट इत्यादी करतात. मग काय कोणी देखील हा निसर्गाचा सोहळा पहायला उत्सुकच होईल. एकतर हा सकुरा फुलण्याचा काळ फार थोड़ा असतो जेम तेम दोन आठवडे, त्यातही जर पावसानी अवकृपा केलीच तर त्यापेक्षाही कमी. पण थोड़ा काळ का होइना ती फुले इतका आनंद देउन जातात की "फुलले रे क्षण माझे फुलले रे..." ह्या शिवाय इतर कोणत्याही ओळी सुचतच नाही. सबंध झाड़ नाजुक अश्या त्या फुलांनी बहरते. झाडाचा बुंधा तेव्हढा सोडला तर फुलांशिवाय बाकी काहीच दिसत नाही. त्याचा मोहक गुलाबी रंग, एकासुरात एकाच झाडाची नव्हे तर शहरातील प्रयेक झाडाची फुलण्याची किमया पाहून डोळ्याचे पारणे फिटणे म्हणजे नेमेकं काय ह्याचा अर्थ कळतो. येता जातांना रस्त्याच्या कडेवर, निवासी संकुलांमधे, बगिच्यांमधे सर्वत्र ही सकुराची झाडे दिसत होती. पण त्याच्याखाली बसून निवांतपणे एक एक फुलाचे सौंदर्य न्याहळ्ण्याची संधी काही मिळत नव्हती. शेवटी ती मिळायला सुटीचा दिवस उजाडला, मग काय आम्ही सारे जवळच्या एका बागेत गेलो. एखाद्या चित्रात शोभेल असं तिथले दृश्य होते. एक मोठे तळं त्याच्या चहुबाजुंनी फुललेली सकुराची झाडे तर होतीच, शिवाय त्या तळ्यात खेळ्णारी बदके, पाण्यात आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेऊ पहणारे पक्षी देखील होते. सकुरा फुलून एक आठवडा उलटुन गेला होता म्हणून सहाजिकच ती फुले गळायला सुरुवात झाली होती. तळ्याच्या पाण्यावर वाकून काही झाडांनी आपली फुले त्यात टाकली होती. तिथल्या पाण्यावर सुंदरशी रांगोळी तयार झाली होती. जरा एका ठिकाणी मोकळी जागा पाहून आम्ही निवांत बसलो, वरतुन त्या फुलाच्या पाकळ्या अंगावर पडत होत्या. जपानी परंपरेनुसार ह्या काळात सारे कुटुंबीय, इष्ट मित्र सारे एकत्र जमातात अणि ह्या झाडाखाली बसून डब्बा पार्टी करतात त्याच्यांत ह्याला हनामी म्हणतात. हा जपानी अनुभव मला जरा नविनच वाटला. सारे जण मिळुन खेळत होते, खात होते काही तर चक्क ओरडत पण होते. रोज सकाळी संध्याकाळी मेट्रो ट्रेन मधे सपाट चेहरा करून आपल्याच कोषात प्रवास करणारी ती हीच माणसे का असा प्रश्न राहून राहून पडत होता. खरच हा निसर्ग सुद्धा ना जशी झाडे फुलवतो तशीच माणसांची मनं देखील खुलवतो. आता काही दिवसात सगळ्या फुलांच्या पाकळ्या जमिनीवरचे सडे होउन पडतील, जातांना आपले सौंदर्य जमिनीला बहाल करून मातीशी एकरूप होतील. मागे फक्त उरेल झाडांची फुटू पहाणारी पालवी, आणि डोळ्यात साठवलेले ते फूललेले क्षण.....

Sunday, March 9, 2008

एक शुभ्र स्वप्नवत सत्य

किती तरी दिवसांचा होणार होणार म्हणुन आम्ही वाट पहात असलेला निसर्गाचा सुंदर आविष्कार शेवटी मागच्या महिन्यात आम्हाला आनंदत चिंब भिजवून गेला. त्या फेब्रुवारी महिन्याचा रविवार असे कही घेउन येइल अशी कल्पनाच मुळी केली नव्हती. सकाळी बाहेर येउन पाहतो तर काय जीकडे तिकडे शुभ्र गालीचा अंथरलेला. आपल्याकडे चातक पक्षी जशी पावसाची वाट पाहतो तशीच किम्बहुना त्यापेक्षा अधिकच आम्ही या हिमवर्षावाची पहात होतो. तसा टोकीयोला हिमावार्शावाचा बरा इतिहास आहे असे ऐकले होते एक दोन जुन्या रहिवाश्यानी देखील मागे १ -२ वर्शापुर्वी असा असा बर्फ पडला होता वगैरे वगैरे रसभरीत वर्णन केले होतेच. हा अनुभव घेण्यासाठी तर माझी उत्सुकता खुप दिवस ताणली गेली, थंडी संपयाची वेळ आली तरी या हिमवर्षावाच्या राजाचा पत्ता नव्हता . आपल्याकडे जस पाउस आला नाही की सगळे वरुणराजाची प्रार्थना करतात पण हिमवर्षावाचे खातेसुध्दा हाच सांभाळतो का ह्याची खात्री नव्हती म्हणुन कोणाची आराधना करावी हे देखील कळत नव्हतं. आम्हा मित्रांमधे कधी कधी कोणीतरी सांगायचं येत्या सोमवारी नक्की होणार बरं का पण तसं कधी व्हायचे नाही आपल्या वेधशाळेच्या अनुमानासराखेच ते खरे व्हायचे बर्फा मधील ब पण सापडायचा नाही पण एकदा नाही म्हणायला सकाळी सकाळी फ़ोन खणखणला ते हे सांगायला की बाहेर पहा बर्फ पडतं आहे. मी खुप काही अपेक्षा मनात घेउन बाहेर गेलो पाहतो तर काय हिमवर्षाव कसला त्याला फारतर हिमशिन्तोडे म्हणता येइल, अगदी कुठ तरी कोपय्राकापय्रात बर्फसराखे काही तरी जमा झाले होते. वरतुन पण अगदी तुरळक कण वगळता काही पडत नव्हते. एकंदर ते हिमवर्षावाचे केविलवाणे रुपच वाटले. मग असे काही इकडे होते हा समजच मनातुन काढून टाकण्याची तयारी केली अणि त्या सकाळी उन्नतीच्या (आमच्या शेजारी रहात असलेली माझी मैत्रिण) दिलेल्या आरवली ने जाग आली सकाळी सकाळी झोपेचा बिमोड करून ही बाई कशाचा सूड घेते आहे ह्या वीचाराने मी बाहेर आलो पाहतो तर काय क्षणभर आपण कुठे आहोत तेच कळत नव्हते, जणू शुभ्र नभ उतरु आले होते. नकळत हाताला एक चिमटा काढूनसुद्धा पहिला की हे शुभ्रस्वप्न तर नाही ना ह्याची खात्री करायला तो निसर्गाचा सुंदर आविष्कार किती पाहू अणि किती डोळ्यात साठवू अस झाले होते. हवेच्याप्रत्येक झुळुकी सोबत आपली दिशा बदलत प्रत्येक हिमकण खाली येवुन विसावत होता. त्याला विशेष असा जागेचा अडसर नव्हता जिथे जागा मिळेल तिथे समुहाने ते हिमकण पुढील काही दिवसांठी आपला तळ ठोकत होता. रस्ते, घरांची छ्ते, झाडांची पाने, वहानांच्या काचा जी पण मोकळी जागा त्या खुल्या आकाशाला खुणावत होती तिथे तिथे तो तितक्याच खुल्या दिलाने हिमकण सांडत होता बालकवीँच्या "हिरवे हिरवे गार गालिचे" या ओळीत थोड़ा बदल करून "शुभ्र शुभ्र ते गार गालीचे " असे म्हणावसं वाटलं अणि खरच त्या ओळी देखील किती तंतोतंत लागु पडत होत्या नाही ? गालीच शुभ्र तर होताच अणि खुप गार गार सुद्धा. स्वत:बद्दलच्या असलेल्या सर्व कल्पना विसरून मुक्त पणे त्या मऊ मऊ भुसभुशीत बर्फावर गडाबडा लोळावसं वाटलं, हातांची ओंजळ करून त्यात तो पडणारा बर्फ अलगत झेलावा अणि त्यावर रंगित सरबत टाकून कडिला खुपसून ख़ावा असं देखील वाटलं, पण शेवटी काय आपल्या प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पना आड़ येतात, लहानपणी कधी गारांचा पाउस पडायचा तेंव्हा खाली पडलेल्या गारा वेचुन मिटक्या मारत खायचो पण आता परत तीच निरागसता तोच मनाचा मोकळेपणा परत मिळेल? असो जेंव्हा काही कामानिमित्तं घराबाहेर पडलो तेव्हाचा अनुभव तर फारच वेगळा होता आपली रोजचीच पायाखालची वाट गायब झालेली, त्या पांढ्र्या शुभ्र वाटेवर मी एकटाच आपल्या पाऊलांचे ठसे उमटवत चाललो होतो जेंव्हा मागे वळुन पहात होतो तेंव्हा ते ठसे वरतुन कोसळणाय्रा बर्फामधे कधीच लुप्त होत होते। आपण कोण्यातरी अनोळखी गावात आलो की के असं वाटत होते. रोजचे रस्ते, घरं आज आपली ओळख दाखवत नव्हते चालतांना खुप काळजी घ्यावी लागत होती, खाली पाहून तर चालावे लागत होतेच तसच वरदेखील लक्ष्य ठेवावे लागत होतं. एखाद्या विजेच्या खांबावर किव्हा घराच्या छ्तावार जमा झालेला तो ऐवज कधी आपली जागा सोडेल ते सांगता येत नव्हते. अगदी दुपारी उशिरापर्यंत हिमवर्षाव चालूच होता शेवटी तो जरा कमी झाला अणि जमिनीवरच्या बर्फाने आपले रूप पालटायला सुरुवात केली बराचसा बर्फा वितळायला सुरवात झालेली होती अणि बरचसा बर्फ घट्ट अणि टणक होत होता . रस्त्यावर बरीच चिक चिक झालेली होती रस्त्यावर जमा झालेला बर्फ कोणी तरी बाजूला लावत होता रात्रि अंधारात जसं काही कापसाचे ढ़िगारे सर्वत्र रचून ठेवले असं वाटत होतं . थंडी देखील जास्त जाणवत होती अणि त्यात जर वारा वहायाला लागला की अगदी जोम्बत होती . एकंदर सर्व काही वेगळे वेगळे वाटत होते .
येणारा आनंद सोबत काय अणि किती घेउन येइल हे कधी सांगता येते? आमच्या उन्नतीचा पाय जरा त्या नुकत्याच पडलेल्या बर्फावरुन मुरगळला अणि बिचारीचे पायाची हाडं ४ ठिकाणी मोडले ऑपरेशन करून पट्या टाकाव्या लागल्या. असं काही झालं की त्या शुभ्र बर्फाला सुद्धा किती काळीकुट्ट किनार असू शकते हे पण लक्ष्यात येते।
शेवटी असा हा हिमवर्षाव मुळात खरंच खुप सुंदर असतो आयुष्यात अनुभवयाला मिळाला तर नक्की घ्यावा असा. पण जरा सावध होवून बरं का ...

Saturday, January 26, 2008

प्रस्तावना


आज मी फार फार वर्षानी काही लिहियाला घेतले आहे अर्थात मी पुर्वी खुप काही लिहित होतो असे नाही. कधी कधी एखाद्या बालसहित्यीकांच्या पुस्तकात कींवा एखाद्या मासिकत कथा छापुन येई, फार नही तर शाळा, महाविद्यालायाच्या वार्षिक अंकात लेख छापून यायचा. आपले नाव कुठे तरी छापुन येतं याचाच आनंद त्यावेळेस जास्त होता कदाचित त्या लहान वयात माझ्या लिहिण्याचा उद्देश पण माज्या लिखाणासारखा बालिश देखील असेल पण पुढे आपोआप त्यात खंड पडत गेला. मग पुढे १० वी १२ वी मग उच्च्शीक्षण शिक्षण या सगळ्या गोंड्स नावाखाली तर ते पार नहिसे झाल्यासारखे झाले सोबतच अवांतर वाचन पण फ़क्त वर्त्तमान पत्रा पुरते मर्यादित झाले (पुढे तर २४ तास वृत्त वहिन्यानिं उरलेली कसर पूर्ण केली. मग पुढे जेंव्हा पोटा पाण्याचा प्रश्न सुटला तेंव्हा कधी कधी वाटायचे आता परत वाचन लिखाण करता येइल पण नाही पुढे मग वाटायचे मराठीत किती तरी लेखक अणि कवी आहेत, त्यात आपल्याने कोणती मोलाची भर पडणार ? (खरतर तो आळशीपणा होता) असे ३-४ वर्ष गेले, नंतर माझ्या लक्ष्यात आले आपण काहीतरी फार गमवातो आहे आणि ते म्हणजे आपली अभिव्यक्ति कि जी प्रत्येकाला असते फ़क्त ती व्यक्त होण्याचे प्रकार वेगळे असतात कोणाची ती संगीतातुन व्यक्त होते कोणाची एखाद्या क्रिडेतुंन अगदी कोणाची कामातुन आणि कोणाची तर विध्वंसक कृतितुनदेखिल. मग आपली अभिव्यक्ति कशातुन व्यक्त होत असेल प्रश्न मला पडला आणि लक्ष्यात आले कि ती व्यक्त होते आहे आपल्या सध्याच्या बोलण्यातुन बरेच दा मित्रांसोबत विनोद निर्मिति करण्याच्या प्रयत्नात असे शब्द , उपमा वापरले जातात जे दैनदिन व्यवहारत वापरले तर फार वेगळे वाटतात . हे सारे येतात कुठून? कदाचित खोलवर जे कुठे तरी माझं साहित्य प्रेम आहे त्यातून तर वर येत नसतील? मग आशा शब्दांना अणि पर्यायानी आपल्या भावनांना वाट करून देण्यास फक्त तेवढाच मार्ग नक्कीच नाही (आणि बरेचदा अशा प्रकारचा विनोद निर्मितिच्या प्रयत्नात विनोदापेक्षा आपलेच हसे जास्त होते)
अर्थात इथे या ब्लोग वर देखील मी किती अणि काय लिहू शकेल याची मला खात्री नाही पण एवढे मात्र नक्की जे काही मनात असेल ते यातून बाहेर पडेल, कधी त्यात भावनाचा कल्लोळ असेल तरी कधी असंबद्ध वाटतील असे विचार, ते कोणी वाचेल न वाचले कोणाला आवाडेल न आवडेल या बाबी सध्या तरी दुय्यम आहेत . माझ्या लेखी हा फक्त एक मनाचा दर्पण आहे . जसं आपण आरश्यात पाहून स्वतःला नीट नेटके ठेवण्याचा प्रयत्न करत असतो अगदी तसाच , बाह्य रूप आरशात पहाता येते ते पाहून त्यात हवे नको ते बदत करता येतात वेगवेगळे प्रयोग (फँशन म्हणुन ) करता येतात मग ज्या आपल्या संस्कृतित मनाच्या सुंदरतेला देखील तेव्हढेच किंबहुना थोडे जास्तच महत्व दिले आहे त्याचा आरसा मिळतो कुठे? कसा आपण आपले मन ओळखायचे अणि त्याला सुन्दर बनवाचे ह्या सर्वाची उत्तर कुठे मिळत नाही जे काही मिळतात ते सुद्धा आपल्याला लागु पडतीलच असे नाही शेवटी आप्ल्यालाच आपला शोध घ्यावा लागतो एवढे नक्की मी देखील त्याच शोधत आहे जे काही असेल ते इथे लिहुन व्यक्त करेल, व्यक्त झालेले न्याहळेले, वाटले तर त्यात बदल करेल शेवटी मनातले कुठे तरी व्यक्त झाल्यावरच कळनार ना ते काय म्हणते आहे, सध्या तरी माला हा सरळ सोपा आणि साधा मार्ग आहे असे वाटते बघुया तो कुठे घेऊन जातो ते...आणि हो तुम्हाला तो आवडला नाही आवडला तरी प्रतिक्रिया नक्की द्या बर का, कारण आरश्यात आपण कितीसुद्धा पाहुन सजवले तरी बाहेरून कोणी त्याला प्रतिक्रिया दिल्याशिवाया त्याचे चीज़ झाल्यासारखे वाटत नाही ना......