Saturday, April 5, 2008

सांगा वसंत कुणी हा पहिला...

गेले दोन तिन महीने असलेले थंडीचे दिवस कसे बसे कुडकुडत काढले. सगळ्या हालचाली कशा थंड झाल्या होत्या. गुलाबी थंडी वगैरे असली विशेषणे काही टोकियोच्या थंडीला लागु पडत नाही. शेवटी तिकडे भारतात होळी जळाली आणि इकड़ची पण थंडी पळाली. मग वेध लागले ते सकुरा म्हणजे चेरी ब्लोसोमचे. बहुतेक झाडे निर्जीव झाल्यासारखी उभी होती. सगळी कशी काळी काळी अंगावर एकही पान नसलेली सजिवत्वाची एकही खुण न दाखवणारी. रोज येता जाताना तसली झाडे पाहून पाहून नजर देखील सरावली होती. पण एक दिवस अचानक नेहमीच्या रसत्यावरुन वळतांना त्या कडेवर असलेल्या झाडेने जणू हाकच दिली पाहतो तर काय त्याने चक्कमोहरायाला सुरवात केली होती. वसंत येत असल्याची ती नांदीच होती. शेवटी तो आला हाहाम्हणता एकूण एक सकुराचे झाड़ फुलायाला सुरवात झाली, एव्हढ चैतन्य इतके दिवस कसे ह्या झाडांनी लपवून ठेवले असे वाटले . इथला वसंत ऋतु कोकिळेच्या गाण्याची वगैरे वाट बघत नाही, तसही इकडे काउ चिऊ दिसतात पण कोकीळ आहे का माहित नाही. तसा वसंत ऋतु कही पहिल्यादा पहिला असे नाही, झाडांना पालवी फुटलेली पहिली आहे. काही झाडांना फुलानी बहरलेले पाहिले आहे. पण या वसंत ऋतुचे एवढे व्यापक अणि सुंदर रूप नव्ह्ते पहिलं. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात हे सर्व ऋतुंचे खांदेपालट बघायला वेळ कुठे असतो पण हा होणारा बदल लक्ष्यात आणून द्यायचे काम जागोजागी असलेली स्टेशनमधिल सकुराच्या छायाचित्रांनी नटलेले जहिरातिचे फलक, दुकानांची सजावट इत्यादी करतात. मग काय कोणी देखील हा निसर्गाचा सोहळा पहायला उत्सुकच होईल. एकतर हा सकुरा फुलण्याचा काळ फार थोड़ा असतो जेम तेम दोन आठवडे, त्यातही जर पावसानी अवकृपा केलीच तर त्यापेक्षाही कमी. पण थोड़ा काळ का होइना ती फुले इतका आनंद देउन जातात की "फुलले रे क्षण माझे फुलले रे..." ह्या शिवाय इतर कोणत्याही ओळी सुचतच नाही. सबंध झाड़ नाजुक अश्या त्या फुलांनी बहरते. झाडाचा बुंधा तेव्हढा सोडला तर फुलांशिवाय बाकी काहीच दिसत नाही. त्याचा मोहक गुलाबी रंग, एकासुरात एकाच झाडाची नव्हे तर शहरातील प्रयेक झाडाची फुलण्याची किमया पाहून डोळ्याचे पारणे फिटणे म्हणजे नेमेकं काय ह्याचा अर्थ कळतो. येता जातांना रस्त्याच्या कडेवर, निवासी संकुलांमधे, बगिच्यांमधे सर्वत्र ही सकुराची झाडे दिसत होती. पण त्याच्याखाली बसून निवांतपणे एक एक फुलाचे सौंदर्य न्याहळ्ण्याची संधी काही मिळत नव्हती. शेवटी ती मिळायला सुटीचा दिवस उजाडला, मग काय आम्ही सारे जवळच्या एका बागेत गेलो. एखाद्या चित्रात शोभेल असं तिथले दृश्य होते. एक मोठे तळं त्याच्या चहुबाजुंनी फुललेली सकुराची झाडे तर होतीच, शिवाय त्या तळ्यात खेळ्णारी बदके, पाण्यात आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेऊ पहणारे पक्षी देखील होते. सकुरा फुलून एक आठवडा उलटुन गेला होता म्हणून सहाजिकच ती फुले गळायला सुरुवात झाली होती. तळ्याच्या पाण्यावर वाकून काही झाडांनी आपली फुले त्यात टाकली होती. तिथल्या पाण्यावर सुंदरशी रांगोळी तयार झाली होती. जरा एका ठिकाणी मोकळी जागा पाहून आम्ही निवांत बसलो, वरतुन त्या फुलाच्या पाकळ्या अंगावर पडत होत्या. जपानी परंपरेनुसार ह्या काळात सारे कुटुंबीय, इष्ट मित्र सारे एकत्र जमातात अणि ह्या झाडाखाली बसून डब्बा पार्टी करतात त्याच्यांत ह्याला हनामी म्हणतात. हा जपानी अनुभव मला जरा नविनच वाटला. सारे जण मिळुन खेळत होते, खात होते काही तर चक्क ओरडत पण होते. रोज सकाळी संध्याकाळी मेट्रो ट्रेन मधे सपाट चेहरा करून आपल्याच कोषात प्रवास करणारी ती हीच माणसे का असा प्रश्न राहून राहून पडत होता. खरच हा निसर्ग सुद्धा ना जशी झाडे फुलवतो तशीच माणसांची मनं देखील खुलवतो. आता काही दिवसात सगळ्या फुलांच्या पाकळ्या जमिनीवरचे सडे होउन पडतील, जातांना आपले सौंदर्य जमिनीला बहाल करून मातीशी एकरूप होतील. मागे फक्त उरेल झाडांची फुटू पहाणारी पालवी, आणि डोळ्यात साठवलेले ते फूललेले क्षण.....